| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर 34 बी, ट्युलिप को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये चार तरुण-तरुणी अडकल्याची घटना घडली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही लिफ्ट चौथ्या मजल्यावर अडकली होती. मात्र, सिडको अग्निशमन केंद्र खारघरच्या जवानांनी तत्परता दाखवत तब्बल दीड तासांपासून अडकलेल्या या सर्वांची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, खारघर-तळोजा जेल रोड परिसरातील ट्युलिप सोसायटीमधील वीज अचानक गायब झाली. याच दरम्यान इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करणारे 2 तरुण आणि 2 तरुणी लिफ्ट अचानक बंद पडल्याने चौथ्या मजल्यावर अडकले. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दांडेकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन केंद्राला दुपारी साडे चार वाजता या घटनेची ‘रेस्क्यू वर्दी’ला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अग्निशमन वाहन केंद्रातून रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत त्यांच्याकडील रेस्क्यू टूलमधील ‘ कटवणी’ आणि ‘स्प्रेडर’च्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा यशस्वीपणे उघडला. लिफ्ट उघडताच आतमध्ये सुमारे 1 ते दीड तासांपासून अडकून पडलेल्या चारही जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्याने या तरुणांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आणि प्रशासनाचे आभार मानले. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सिडको अग्निशमन केंद्र खारघरचे अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, ड्रायव्हर ऑपरेटर दीपक पाटील, आणि फायरमन गुरुनाथ तांडेल, केतन पाटील, विकास सूर्यवंशी व कुणाल पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांची अग्निशमन दलाकडून सुटका
