तीन-चार दुकाने जळून खाक
। पालघर । प्रतिनिधी ।
विरार पूर्वेकडील साईनाथ सर्कल जवळ रस्त्याच्या कडेला पत्र्याचे बांधकाम करून उभारण्यात आलेल्या दुकानाला शॉक सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन ते चार दुकाने जळून खाक झाली असून त्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना सोमवारी (दि.9) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात राजरोसपणे पत्र्याचे शेड उभारून त्यामध्ये दुकाने थाटली जात असल्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. याच दुकानांमध्ये विद्युत जोडणी, पाणी जोडणी महानगरपालिकेकडून दिली जाते. यामध्ये विरार शहरात अशा दुकानांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सोमवारी विरार पूर्वेकडील साईनाथ सर्कलजवळ रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या पत्राच्या शेडमध्ये आग लागण्याची घटना घडली होती. या आगीमध्ये या दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये हॉटेल, चपल्ल दुकान, पान टपरी, कॉस्मेटिक अश्या दुकानांचा समावेश होता.