महाड-मुरूड एसटीच्या इंजिनमध्ये आग

प्रवाशांमध्ये घबराट; सुदैवाने हानी नाही

| मुरूड-जंजिरा | प्रतिनिधी |

सोमवारी सकाळी महाड येथून मुरुडला येणाऱ्या एसटीच्या इंजिनमध्ये आग लागली. धुराचे लोट वाढत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना एसटीतून खाली उतरल्याने दुर्घटना टळली. हि घटना विहूर येथील पेट्रोलपंपानजीक असणाऱ्या एसटी थांब्यावर घडली.

एसटीमधून प्रवासी उतरल्यावर लागलेली आग विझवण्यासाठी चालक आणि वाहकाबरोबर प्रवाशांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. चालक महेंद्र चोरघे यांनी विहूर पेट्रोलपंपामधून अग्निरोधक सिलिंडर आणून पेट्रोलपंपातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने इंजिनला लागलेली आग विझवली. प्रत्यक्ष दर्शी घटना पाहणारे विहूर ग्रामपंचायत सदस्य परेश तांबे यांनी सांगितले की, गाडीच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागल्यावर प्रवासी आरडाओरडा करून गाडीतून बाहेर येऊ लागले. चालकाच्या केबिनमधील धुराचे लोट वाढल्याने एसटी उभी करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना सुखरूप खाली उतरण्यात आले. आग विझवल्यानंतर या घटनेबाबत मुरुड आगारातील अधिकारी यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इंजिनमधील दोन तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होऊन सदरची घटना घडली आहे. या गाडीची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version