रिलायन्सच्या गॅस स्टेशननजीक आग ; आरसीएफ जवानांच्या तत्परतेमुळे टळला धोका

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मांडवा जेटी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशनजवळ मोठी आग लागल्याची सूचना आरसीएफ थळच्या अग्निशमन केंद्रास प्राप्त झाली. त्याचसोबत रिलायन्स, नागोठणे येथील जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी आरसीएफ जनसंपर्क विभागाकडे आरसीएफ थळच्या अग्निशमन दलाच्या मदतीसाठी दूरध्वनीवरून विनंती केली. घटनेची गांभीर्याने दखल घेत आरसीएफ प्रशासनाने अग्निशमन बंब आणि कर्मचारी त्वरित रवाना केले. अवघ्या 20 मिनिटांत आरसीएफ थळचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि वरिष्ठ अग्निशमन अधिकारी विष्णू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हनिफ कुरेशी, हरिश्‍चंद्र बावकर, तुषार कवळे, विशाल मंडलिक, अतुल ठाकूर या अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अंदाजे 2 ते 3 एकर जमिनीवर पसरलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, रिलायन्सचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग पूर्णत: विझविण्यात आली.

रिलायन्स कंपनीला गॅस पुरवठा करणार्‍या पाइपलाईन्स आणि वाल्व स्टेशनजवळच असल्याने ही आग पसरू न देणे गरजेचे होते. आरसीएफ थळच्या अग्निशमन दल जवानांच्या तत्पर आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली.

Exit mobile version