| पनवेल | वार्ताहर |
पनवेल-उरण रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळील मोकळ्या जागेत लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आणल्याने पनवेल अंधारात जाता जाता वाचले.
पनवेलमध्ये उरण नाका येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वाढली आहेत. त्या उपकेंद्राच्या आवारात आजूबाजूचे नागरिक कचरादेखील टाकतात. उपकेंद्र असल्यामुळे भूमीगत विद्युत तारादेखील तेथून गेल्या आहेत. त्याठिकाणी अशाच मोकळ्या जागी कचरा टाकण्यात आला होता. अचानक या कचर्याजवळ आग लागली. ती आग वाढू लागली. या आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच जागरूक नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. अग्निशमन दलाचे जवान काही क्षणातच सदर ठिकाणी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. ही आग आटोक्यात आणली नसती तर भूमीगत विद्युत तारांना आग लागली असती. त्यामुळे पूर्ण पनवेल शहर अंधारात जाण्याची शक्यता होती.