कळंबोलीत खासगी शिकवणीला आग

दप्तर तिथेच टाकून मुलांनी काढला पळ

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

कळंबोली वसाहतीमधील एका खासगी शिकवणी वर्गाला आग लागण्याची घटना शनिवारी (दि.9) घडली. दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी शिकवणीसाठी आलेली मुले वर्गात उपस्थित होती. आग लागताच मुलांनी दप्तर वर्गातच टाकून धूम ठोकल्याने पुढील दुर्घटना टळळी.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 3 ई येथील एफ 9 या इमारतीमधील दुसर्‍या माळ्यावर व्यास अकॅडमी नावाने शिकवणी वर्ग चालवले जातात. रहिवासी इमारतीत सुरु असलेल्या शिकवणीच्या खोलीत लावण्यात आलेल्या वातानुकुलीत (एसी) यंत्राच्या कॉम्प्रेसरला आग लागल्याने ही घटना घडल्याचे घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमानुसार वातानुकुलीत यंत्राचे कॉम्प्रेसर वर्गाबाहेर असणे आवश्यक आहे. शिकवणी चालकांनी मात्र हे कॉम्प्रेसर वर्गाच्या आतल्या बाजूस ठेवल्याने गर्मीमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसून, दुर्घटनेप्रसंगी सुरक्षितस्थळी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आपत्कालीन मार्ग उपलब्ध नसल्याने शिकवणी चालकांना नोटीस बजावणार असल्याची माहिती देखील अग्निशमन अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचलेल्या कळंबोली अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

Exit mobile version