टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग

70 वर्षीय प्रवाशाचा होरपळून मृत्यू

| अनाकापल्ली | वृत्तसंस्था |

आंध्र प्रदेशमधील अनाकापल्ली जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. टाटानगरहून एर्नाकुलमला जाणाऱ्या टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला (18189) भीषण आग लागली. या आगीमध्ये दोन एसी कोच जळून खाक झाले असून एका 70 वर्षीय प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तर, शेकडो प्रवाशांनी वेळीच रेल्वेबाहेर उडी घेत जीव वाचवला. त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नगरहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस विशाखापट्टणमार्गे प्रवास करत होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास दुव्वाडा ओलांडल्यानंतर या एक्सप्रेसला आग लागली. ही रेल्वे अनकापल्ली जिल्ह्यातील यलमंचिली रेल्वे स्थानकाजवळ आल्यावर लोको पायलटला डब्यातून आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या. त्याने प्रसंगावधान राखत रेल्वे तत्काळ स्थानकावर थांबवली. पँट्री कारच्या शेजारी असलेल्या 1 आणि 2 या दोन एसी डब्यांमध्ये भीषण आग लागली होती. गाडी यलमंचिली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते, त्यामुळे दोन्ही डबे आणि डब्यांधील प्रवाशांचे सामान पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्येही घबराट पसरली आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेमधून बाहेर उडी घेतली. मात्र, विजयवाडा येथील चंद्रशेखर सुंदर (70) हे 1 डब्यात अडकल्याने त्यांना वेळीच बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान, 1 डब्याचे ब्रेक ओव्हरहीट झाल्यामुळे ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आहे.

Exit mobile version