स्लॅब कोसळून महिला जखमी
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नागरिकांचे तसेच प्राणीमात्रांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे पनवेल महानगरपालिकेचे नवीन पनवेल येथील अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारीच आज असुरक्षित वातावरणात काम करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी अग्निशमन केंद्राच्या इमारतीतील स्लॅबचा भाग अचानक कोसळून महिला कर्मचारी सोनल गेगजे यांच्या खांद्यावर पडला. या दुर्घटनेत त्यांच्या खांद्याला व हाताला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतरही संबंधित इमारतीची स्थिती अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप कर्मचारी वर्गातून केला जात आहे. इमारतीच्या भिंती ओलाव्यामुळे कमकुवत झाल्या असून, छताचा स्लॅब ठिकठिकाणी तडकला आहे. लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असून खांबांना मोठमोठे तडे गेले आहेत. प्रवेशद्वाराचे गेटही मोडकळीस आले आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाने याबाबत पनवेल महापालिकेच्या बांधकाम विभागाला वारंवार माहिती दिली आहे. अधिकारी पाहणी करून गेले असले, तरी अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याची नाराजी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
