| माणगाव | प्रतिनिधी |
पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. यावर्षी पाऊस लांबल्याने थंडीचा मौसम सुरू होण्यास उशीर झाला होता. गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळ गारवा वाढू लागला आहे.
हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी पडणारे दाढ धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपऱ्यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिसू लागले आहेत.
गारवा वाढत जाईल तसे शेकोट्याभोवती गर्दी वाढत जाणार आहे. या शेकोट्यांमुळे गप्पांचा फड रंगू लागला असून मनोरंजन होते आहे. अडगळीतील लाकडे, पाळा पाचोळा, टाकाऊ कागद, पुठ्ठे इत्यादींचा वापर करून या शेकोट्या केल्या जातात. अनेक ठिकाणी हिवाळ्यासाठी खास मोठे लाकूड, ओंडके शेकोटी करिता ठेवले जाते. दररोज ते पेटवून शेकोटी केली जाते. लहान मुले, स्त्री-पुरुष, वृद्ध, तरुण सर्वजण या शेकोट्यांचा आनंद घेतात. सार्वजनिक ठिकाणी, चौक या ठिकाणी तर आवर्जून शेकोट्या केल्या जातात. सकाळी साधारणता साडेसात, आठ वाजेपर्यंत अगदी सूर्याची किरणे जाणवेपर्यंत शेकोटीचा आनंद घेतला जातो. तसेच रात्रीही जेवणानंतर अनेक ठिकाणी शेकोट्यांभोवती उबदारपणा घेतला जाऊ लागला आहे. हिवाळा आणि शेकोटीचा हा कार्यक्रम सर्वांच्या जीवनातील आनंदाचा भाग असून गाणी, गप्पा, विनोद आणि मनोरंजनाची वेगळी अशी पर्वणी या निमित्ताने सर्वांना मिळते आहे. ठराविक गावाचे नाव घेऊन त्या गावचा म्हातारा शेकोटीला आला असे गीत हमखास या शेकोटी मधून ऐकायला मिळते. शेकोटीची ही संकल्पना प्राचीन असून शेकोटी आणि हिवाळा हे नाते अधिक घट्ट होत आहे.
हिवाळा आणि शेकोटी यामधून अनेक आठवणी आहेत. थंडीच्या दिवसांत शेकोटी करण्याची मजा काही औरच असते. आजकाल व्यस्त जीवनामुळे शेकोटीचा कार्यक्रम दुर्मिळ होत असला तरी थंडीच्या दिवसात शेकोटी भोवती बसणे हा आनंदाचाच भाग असतो.
-राजेश भावे,
शेकोटी प्रेमी.
थंडीच्या दिवसांत उबदारपणासाठी पेटविल्या जाणाऱ्या शेकोट्या ही बाब नित्याची असून, यामुळे मित्र मंडळ परिवार एकत्र येऊन गप्पांचा मनमुराद आनंद घेतात. यामुळे मैत्रभाव वाढीस लागतो, मनोरंजन होते.व्यस्त राहण्याच्या या काळात शेकोटीमुळे माणसे एकत्र येतात ही बाब समाज हितासाठी चांगली आहे.
-काशिनाथ गाणेकर
शेकोटीप्रेमी.







