शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड जखमी
। कल्याण । वृत्तसंस्था ।
जमिनीच्या वादातून अंबरनाथ हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा खाजगी अंगरक्षक हर्षल केणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
एकनाथ शिंदे यांचा गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न “पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी (महेश गायकवाड) ताबा घेतला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. माझ्या मुलांना जर पोलीस ठाण्यात मारत असतील तर मग मी काय करणार? पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो (महेश गायकवाड) वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे.” असं गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे.