एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत धामोते येथे एका व्यक्तीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदलापूर येथून घरी परतत असताना एका भाडेकरु व्यक्तीवर गोळीबार झाला असून, जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धामोते येथील श्री स्वामी समर्थ चाळीमध्ये राहणारे सचिन अशोक भवर हे बदलापूर जवळील मानकिवली येथील एमआयडीसीत नोकरीला आहेत. ते पेशवाई रस्त्याने मंगळवारी (दि.25) रात्री सव्वा नऊ वाजता आपल्या स्कुटी वरून घरी परतत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करत होते. पुलाजवळ अंधाराचा फायदा घेत आरोपींनी भवर यांची गाडी अडवली. त्यावेळी काय रे तुला माज आला आहे काय असे विचारत स्वतःच्या जवळील रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला. त्यातील एक गोळी सचिन भवर यांच्या कमरेच्या बाजूने गेली तर दुसरी गोळी पोटाच्या उजव्या बाजूला जखम करून गेली. रात्री सव्वा नऊ वाजता ही घटना घडली असून, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमी भवर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सकाळी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली असून, पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या गुन्ह्याची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जगन्नाथ मार्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.






