| पाली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आत्मा योजना अंतर्गत सुधागड- पाली तालुक्यातील 50 शेतकऱ्यांना शेततळे व जलकुंडामध्ये मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रति शेतकरी 1000 मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम बुधवारी (दि. 22) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पंचायत समिती सुधागडचे उपसभापती संदेश शेवाळे, निवडणूक नायब तहसीलदार नकुल पोळेकर, वन परिक्षेत्र अधिकारी सोनवणे तसेच तालुका कृषी अधिकारी सुधागड पाली श्रीमती दयावंती कदम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोहू, कटला व सायप्रिनस या मत्स्यबीजांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
सुधागड- पाली तालुक्यातील शेततळे व मागील वर्षी खोदण्यात आलेल्या जलकुंडातील पाण्याचा वापर संरक्षित सिंचनासाठी करण्यात येत असून, या जलस्रोतांमधून मत्स्यपालन व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी पाली विनोद बोबडे, मंडळ कृषी अधिकारी परळी रामकिशन शिंदे तसेच, सुधागड तालुक्यातील सर्व उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपकृषी अधिकारी उदय भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. आत्मा योजनेअंतर्गत शेततळे व जलकुंडांचा बहुउद्देशीय वापर करून संरक्षित सिंचनाबरोबरच मत्स्य उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असल्याचे तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी सांगितले.
सुधागड तालुक्यात मत्स्यबीज वाटप
