महिलांकरिता मत्स्य उत्पादन मूल्यवर्धन प्रशिक्षण

| वावोशी | वार्ताहर |

केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राने अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत स्वच्छता आणि मासे आणि मत्स्य उत्पादनाचे मूल्यवर्धन या विषयावर खालापूर तालुक्यातील आपटी या ठिकाणी महिलांकरिता मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपटीमधील सिद्धव्रत नगर येथील 30 महिलांनी सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्र महाराष्ट्रातील समुदायासाठी दरवर्षी तीन दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करते. त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील आपटी येथे अनुसूचित जाती उपयोजना योजनेंतर्गत माशांची स्वच्छता, मासे आणि मत्स्य उत्पादनाची हाताळणी व मूल्यवर्धन हा कार्यक्रम संपन्न झाला. कोची विभागाचे संचालक डॉ. जॉर्ज निनान, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. सुरेश, कोचीचे नोडल अधिकारी डॉ. आशा के के आणि प्रमुख शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. वाशी, नवी मुंबईचे प्रभारी वैज्ञानिक डॉ. अभय कुमार आणि कार्यक्रम समन्वयक यांनी मासे आणि मत्स्य उत्पादनाची स्वच्छता आणि हाताळणी मूल्यवर्धनफ या विषयावर महिलांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमात माशांची साफसफाई आणि कटिंग करताना व त्यापासून पदार्थ बनवताना स्वच्छता कशी राखावी आणि फिश लोणचे, फिश बॉल, फिश कटलेट, फिश फिंगर आणि बटरफ्लाय कोळंबी इत्यादी विविध मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनांची तयारी कशी करावी याचे प्रात्यक्षिकही प्रशिक्षणार्थींना करून दाखवण्यात आले.

यावेळी सीआरपी आश्विनी मोरे, वैजयंती मनवे व आपटी मधील रमाई महिला बचत गटाच्या विशेष प्रयत्नाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात पंचशिल, नमो बुद्धाय अशा तीन महिला बचत गटातील एकूण 30 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

आजपर्यंत लोणचे हे शाकाहारी पदार्थ आहे हे माहिती होते पण माशांपासून लोणचे, फिश फिंगर, फिश बॉल, कटलेट बनवले जातात हे पहिल्यांदाच या प्रशिक्षणातून माहिती झाले. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत जर असे पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या व्यवसायातून केला तर माझ्या विभागातील महिला नक्कीच पुढे जातील असा मला विश्वास आहे.

कामिनी पांडवे,
सरपंच ग्रामपंचायत आपटी

केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या माध्यमातून महिला प्रशिक्षणार्थींना त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा छोटासा अन्न उपक्रम सुरू व्हावा हा या प्रशिक्षणाचा उद्देश असून त्यांना जर मत्स्य पदार्थ तयार करताना अडचण निर्माण झाल्यास आमच्या विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल.

डॉ. अभय कुमार वैज्ञानिक,
केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिकी संस्थान
Exit mobile version