। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सर्वसाधारणपणे नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करुन मासेमारी बोटी समुद्रात उतरुन मासेमारीचा हंगाम सुरू होतो. यंदा हवामान चांगले असल्याने या हंगामाला लवकरच सुरू होताना दिसत आहे. दोन महिन्यांपासून बसुन असलेले मुरुड, एकदराचे कोळी मच्छीमार बांधव आपल्या उदारनिर्वाह करिता आपल्या बोटी पुन्हा घेऊन खोल दर्यात जाण्यास सज्ज झाला आहे.
मुरुड येथील एकदरा पुलाखाली सहा सिलेंडरच्या असणार्या शेकडो बोटींची डागडुजीची कामे पुर्ण करुन मच्छीमार कोळी बांधव खोल समुद्रात मासेमारीकरिता जात असतात. खोल समुद्रात गेल्याने पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस मासेमारी करित असतात. तद्पूर्वी आपल्याला मिळालेली मासळी ताजी राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ बोटीत भरण्यात येते. याचबरोबर रॉकेल, डिझेल, महिनाभर पुरेल एवढे धान्य, खाद्यपदार्थ व विविध वस्तू बोटीवर भरण्यास सुरुवात केली आहे. विविध संकटाना सामोरे जाणारे मच्छीमार पुन्हा नव्या उमेदीने मासेमारी करण्यासाठी खोल दर्यात जाण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी समस्त कोळी मच्छीमार बांधव ‘मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन दे, झालेला कर्ज फिटुन दे, धंद्यात चांगला फायदा होऊन दे’, हीच प्रार्थना सागाराकडे करित आहेत.