1 ऑगस्टपासून होड्या समुद्रात जाणार
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
दोन महिने कमाई विना बसून असलेले मच्छिमार बांधव 1 ऑगस्टपासून समुद्रात होड्या नेण्याच्या तयारीत असून होड्यांची डागडुजीसह अन्य कामे पूर्ण करण्याच्या कामी मुरूड तालुक्यांतील मच्छिमारांची लगबग सुरु झाली आहे. परंतु, समुद्रात वादळी वार्यासह चार दिवस पाऊस सांगितल्याने कोळी बांधव चिंतेत आहेत.
सर्वात महत्वाचा मासेमारीचा पहिल्या हंगामाला उशीर होत आहे देवाकडे समुद्राला शांत होण्याच्या विनंतीसाठी मरूड कोळीवाड्यात पूजाअर्चा करतात. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. जुलै महिन्याच्या शेवटचा आठवड्यात पाऊस नसतो. वारा वादळ कमी होते. परंतु यावर्षी 27 जुलै आले तरी पाऊस वारा थांबत नाही म्हणून कोळी बांधव चिंतेत आहेत. गेल्या 12/13 दिवसापासून संततधार पाऊस कोसळला असून आतापर्यंत 2121 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोळी समाज हा धार्मिक परंपरा जपणारा असून समुद्रात होड्या लोटण्यापूर्वी मल्हार मार्तंड देवाला कौल लावण्याची परंपरा आहे. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याला वेग असल्याने किती नौका निघतील याचे अनुमान लावणे तुर्तास कठीण असले तरी नेमक्याच मोठ्या नौका मुहूर्त काढून मच्छिमारीसाठी जाणार आहेत. परंतु पूर्वतयारी म्हणून जाळी भरणे, खलाशांची जमवाजमव, डिझेल, बर्फ, अन्नधान्य भरून तयारी काही मच्छीमारांनी चालविली आहे. समुद्रकिनारी जाळी विणणे, होड्यांना तेलपाणी, डागडुजी, रंग लावणे, बोर्ड रंगवणे आदी कामे अंतीम टप्प्यात आहेत.
मुरुड तालुक्यात राजपुरी, एकदरा, मुरूड, मजगाव, दांडा, काशिद, बोर्ली, कोर्लई, साळाव व चोरढे मिळुन 750 हून अधिक मासेमारी नौका चालकांनी दोन महिने शासन आदेशाप्रमाणे पूर्णपणे मच्छिमारी बंद ठेवली आहे. गेल्या 3/4 वर्षांपासून समुद्रातील हवामान बिघडल्याने तुफान, वादळाचा सामना करताना मत्स्यव्यवसाय आर्थिक नुकसानीत आहे . परिणामी या व्यवसायातील लोकांना खुपच संघर्ष करावा लागल्याचे चित्र आहे.
मासेमारी बंदी काळात
मच्छिमारांनी केलेला खर्च वाया जातो. सरकार आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करते. अशा स्वरूपात मच्छिमार बांधवांनादेखील अशा परिस्थितीत आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून मदत करावी अशी अपेक्षा रायगड मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी व्यक्त केली.





