। चिरनेर । प्रतिनिधी ।
बर्फाच्या वाढत्या खर्चामुळे करंजा येथील मच्छिमार गारठले आहेत. मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी एका मच्छिमार बोटीला 10 ते 15 टनांपर्यंत बर्फ लागते. तर छोट्या बोटींना 5 ते 10 टनांपर्यंत बर्फ लागते. मासळी टिकवण्यासाठी मासळीची विक्री करेपर्यंत तर मासळी पकडल्यानंतर बंदरात पोहोचण्यापर्यंत मच्छिमारांना बर्फाची गरज भासते. बर्फ नसेल तर पकडलेली टनावारी मासळी सडून जाते. त्यामुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होते.
सुमारे 250 कोटी रुपये खर्चून आधुनिक करंजा मच्छिमार बंदर अस्तित्वात आले आहे. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या बंदरात अद्यापही मत्स्य प्रक्रिया व शीतगृहाची व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मच्छिमारांना तळोजा, कल्याण, भिवंडी, नेरळ, नवीमुंबईतील औद्योगिक क्षेत्रातुन 2300 रुपये टन दराने बर्फ आणावे लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे बर्फासाठी मच्छिमारांना 700 ते 800 अतिरिक्त जादा पैसे मोजावे लागत आहेत. उरण परिसरातच बर्फाची व्यवस्था असती तर बर्फासाठी अतिरिक्त जादा पैसे मोजावे लागले नसल्याची खंत पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी व्यक्त केली.