गारव्याने मासळी गारठली

। रायगड । प्रतिनिधी ।

काही दिवसांपासून वातावरणात गारठा वाढला असून समुद्रातील तापमानही कमी झाल्याने खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. त्यामुळे मासळीची आवक 40 टक्क्यांपेक्षा अधिक घटली आहे. परिणामी, मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खवय्यांबरोबर मच्छिमारही आर्थिक संकटात सापडले आहेत. या स्थितीत मासेमारीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मच्छिमारांनी केलेला खर्चही निघत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या थंडीचा गारवा वाढल्याने पुन्हा एकदा मच्छिमारांवर संकट आले आहे. खोल समुद्रातील मासेमारीच्या एका फेरीसाठी लाखाहून अधिक रुपयांचा खर्च येतो. सध्या गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घाटली आहे. त्यामुळे मासळीचे भावदेखील वाढले आहेत. नवी मुंबईतील खाडीकिनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठ्यामुळे कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो. त्यात गारठा वाढला की समुद्रातील तापमानही कमी होते. त्यामुळे खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. रायगडातील बहुतांश मच्छिमार हे ताजी मासळी खरेदी करतात; मात्र त्या मासळीचीदेखील आवक कमी झाल्याने त्यांनादेखील भाववाढीचा फटका बसला आहे. एकीकडे गारठा वाढला; तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवकेवर होतो. कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे भावही वाढले आहेत. खाडीतून मासे, निवढी, बोईस, कोळंबी तसेच चिवणी मिळतात; पण गारठा वाढल्याने त्यांचीदेखील आवक खूपच कमी झाली आहे.

सध्याचे मासळीचे भाव
माशाचा प्रकार किलोचे भाव(रु.)

पापलेट 1,200
सुरमई1,200
बोंबील200 (सहा नग)
कोळंबी 600
जिताडा 1,200
रावस 1,500
घोळ 1,300
हलवा1,200

मांदेली आणि बोंबील हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेसुद्धा महाग झाले आहेत. त्यात वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी, मासळीची आवक घटली असून भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मच्छिमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.

जयश्री पाटील,
मासे विक्रेती
Exit mobile version