मुरुड तालुक्यातील मच्छिमारांना वादळाचा धसका

200 बोटी समुद्रात
| मुरूड | वार्ताहर |
मंदोस वादळ अरबी समुद्रात घोंगावत येत असून त्याचा धसका मच्छिमारांनी घेतला आहे. वादळाचा इशारा देण्यात आला असला तरी त्यापूर्वीच मुरूड, एकदरा, राजपूरी, नांदगाव या समुद्रकिनारपट्टीवरील सुमारे 200 नौका समुद्रात मासेमारी करीता गेलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा मच्छिमार कृती समिती चेअरमन मनोहर बैले यांनी दिली.

हे मच्छिमार 12 ते 15 वाव समुद्र हद्दीत मासेमारी करीत असून त्यांना सूचित करण्यात आले आहे. वादळ तीव्रतेने आल्यास या नौका तत्परतेने किनारा गाठू शकतात अशा समुद्रा च्या भागात नौकामासेमारी करीत आहेत. वातावरणातील अनपेक्षित बदल, पाऊस, वादळी वारे यामुळे या वर्षी मच्छिमारीचे अनेक हंगाम वाया गेलेेले आहेत. यामुळे े मच्छिमार आधीच टेन्शन मध्ये असताना पुन्हा मंदोस नावाचे वादळ अरबी समुद्रावर घोंगावत असल्याने काही नौकांनी आधीच सुरक्षित आसरा घेतल्याचे कळते आहे.मात्र अजुनही सुमारे 200 नौका समुद्रातुन किनार्‍याकडे कूच करीत आहेत.

थंडी वाढल्याने गारठा पडला आहे. मासळी मार्केटमध्ये मासळी येत नसल्याने ठणठणाट दिसून येत आहे. समुद्रात गेलेल्या नौकाना त्वरित माघारी फिरण्याचे संदेश गेले आहेत.तालुक्यातील एकूण नौकां पैकी 20 टक्के नौका आधीच किनार्‍यावर नांगरून आहेत.समुद्रात सोमवारी लाटा उसळत होत्या मात्र तीव्रता फारसी जाणवत नव्हती. समुद्रात काहीही भरोसा नसतो अशी माहिती उपस्थित मच्छिमारांनी दिली. समुद्रात थंडगार वारे वाहत आहेत.वादळाचे सावट आणि दहशत ठिकठिकाणाहून कळत आहे.सोमवारी सकाळ पासून आकाशात पाऊस सदृश आभट पडले होते.सध्या मुरूड तालुक्यातील तापमान 18 सेल्सियस च्या खाली घसरले आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारी रात्री दिलेल्या वृत्तांनुसार 11 ते 15 डिसेंबर पर्यंत अरबी समुद्रात मंदोस वादळाची तीव्रता कायम राहणार असून मच्चीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Exit mobile version