बोटींची रंगरंगोटी, डागडुजी दुरुस्ती पूर्ण; शुक्रवारपासून होणार मासेमारी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गेले दोन महिने मच्छिमार व्यावसायिकांसाठी शासनाने घातलेली मासेमारी बंदी गुरुवार (दि. 31) जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे श्रीवर्धन येथील कोळीवाडा येथे सध्या मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. नव्या हंगामासाठी बोटींची रंगरंगोटी तसेच डागडुजी व दुरुस्ती पूर्ण झाली असून, नवीन हंगामासाठी मच्छिमार व्यावसायिक सज्ज झाला आहे.
पावसाळ्यातील जून व जुलै या दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे माशांच्या प्रजननाचे संरक्षण करणे. पावसाळ्यात अनेक मासे त्यांच्या प्रजनन वाढीसाठी एकत्र येतात आणि या काळात मासेमारी केल्यास माशांच्या संख्येत घट होऊ शकते. मासेमारी बंदीमुळे माशांच्या विविध प्रजातींचे संवर्धन होते, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. या कारणास्तव माशांच्या नैसर्गिक संवर्धनासाठी आणि त्यांची संख्या टिकवण्यासाठी पावसाळ्यात मासेमारी बंद ठेवण्याचा नियम आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील 623 मोठ्या बोटी तर 358 लहान बोटी दोन महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मासे बंदी आदेश लागू असल्यामुळे किनाऱ्यावर नांगरून उभ्या केलेल्या अवस्थेत होत्या. तालुक्यातील साडेसहा हजार मच्छिमार व्यावसायिकांचे लक्ष आता एक ऑगस्टकडे लागले आहे. श्रीवर्धन येथे जीवनाबंदर, मुळगाव कोळीवाडा तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, बागमांडला या परिसरात मच्छिमार व्यावसायिक आहेत. मासेमारी हा दहा महिन्यांचा व्यवसाय असून, या कालावधीत जे आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल त्याच उत्पन्नावर मासेमारी बंदी काळातील दोन महिन्यांचे आर्थिक नियोजन करावे लागते. दरम्यान, मासेमारी बंदीच्या काळात बोंबील, जवळा, अंबड, वाकटी, खारा या सुक्या मासळीच्या होणाऱ्या विक्रीतून मच्छिमार व्यवसायिकांना काहीसा आर्थिक हातभार लागतो.
दोन महिने मासेमारी बंदीच्या काळात बोटींची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली. लाकडी बोटींची दुरुस्ती जास्त प्रमाणात करावी लागायची परंतु सद्यस्थितीत बहुतेक मच्छिमार व्यावसायीकांकडे फायबर बोटी असल्याने दुरुस्ती व डागडुजीचे प्रमाण कमी झाले आहे. इंजिन सर्व्हिसिंग, ओव्हर ऑइलिंग, नवीन पार्ट बसवणे याखेरीज या दोन महिन्यात नवीन जाळी करण्यावर जास्त जोर असतो. नारळी पौर्णिमेनंतर मच्छिमारी हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. वल्हा वरच्या (बिगर यांत्रिकी) होड्याना मेरीटाईम बोर्डाकडून मासेमारी परवाना आहे. या होडीतून किनाऱ्यालगत तसेच खाडीत मच्छिमारी करता येते. परंतु, वातावरण स्वच्छ असेल तरच वल्हा वरच्या होळी तून मासेमारी करता येणे शक्य होते. श्रीवर्धन तालुक्यात वल्हा वरच्या होडीतून मासेमारी करणारी व्यावसायिकांची संख्या जेमतेम पंधरा टक्के आहेत.
व्यावसायिकांची शासनाकडे मागणी
दोन ते तीन वर्षातील वातावरण बघता बारा महिन्यातील काही दिवस हे वातावरण खराब,हवामान खात्याने दिलेले वादळाचे इशारे या कारणाने मच्छिमार व्यवसायिक मासेमारी बंद ठेवतात. मासेमारी बंद हे आर्थिक नुकसान असते. मच्छिमार व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी घेतलेले बँकांची कर्ज, डिझेल परतावा हे प्रश्न आहेतच. या सर्वांचा शासनाने विचार करून सानुग्रह अनुदानाचा विचार करावा. अशी अपेक्षा मच्छिमार व्यावसायिक करीत आहेत.







