होळी उत्सवानंतर मच्छिमार पुन्हा समुद्रात
| आगरदांडा | प्रतिनिधी |
होळी व धुळवडीचा उत्सव आनंदात साजरा करून मुरुड तालुक्यातील मच्छिमार बांधव पुन्हा खोल समुद्रात मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत. उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावी परतलेल्या मच्छिमारांनी आता उदरनिर्वाहासाठी पुन्हा दर्याकडे मोर्चा वळवला आहे.
मुरुड येथील एकदरा कोळीवाड्यातील मच्छिमार बांधव रंगपंचमीचा उत्सव आटोपून खोल समुद्रात जाण्याची तयारीत मग्न असल्याचे चित्र सध्या किनाऱ्यावर दिसत आहे. एकदरा पुलाखाली 6 सिलिंडर असलेल्या सुमारे 25 बोटींचे नाखवे व खलाशी मासेमारीसाठी आवश्यक तयारी करण्यात व्यस्त आहेत. खोल समुद्रात मासेमारी करताना अनेक दिवस समुद्रातच राहावे लागते. त्यामुळे पकडलेली मासळी ताजी राहावी यासाठी बोटींमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साठवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर डिझेल, महिनाभर पुरेल एवढे धान्य, खाद्यपदार्थ, औषधे तसेच इतर आवश्यक साहित्यही बोटींवर भरले जात आहे. वादळ, भरती-ओहोटी आणि विविध संकटांचा सामना करत उपजीविका करणारे हे मच्छिमार बांधव नव्या उमेदीने पुन्हा दर्यात उतरण्यास सज्ज झाले आहेत. उत्सवाच्या आनंदानंतर आता त्यांच्या जीवनाचा खरा प्रवास पुन्हा समुद्राच्या दिशेने सुरू होताना दिसत आहे.
