| पाली | वार्ताहर |
जिल्ह्याला 240 किमीचा सागरीकिनारा लाभला आहे. येथील कोळीबांधव आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मत्स्यव्यवसायाच्या माध्यमातून करतात; परंतु सध्या सर्वत्र मासळीचा दुष्काळ पडला आहे. नैसर्गिक संकटे, प्रदूषण व सरकारी धोरणांमुळे मत्स्यदुष्काळ ओढवला असल्याचे कोळीबांधवांचे म्हणणे आहे. शासनाने कोळीबांधवांसाठी मदत केली पाहिजे, अशी मागणी समस्त कोळी समाजाकडून करण्यात येत आहे.
वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती, वादळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारचे उदासीन धोरण यामुळे कोळीबांधवांच्या जीवनात वारंवार संकटे येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील मत्स्यव्यवसाय धोक्यात आला आहे. मच्छीमारांना असंख्य समस्या भेडसावत आहेत. जेट्टी, स्वच्छतागृह, शीतगृह यांचा अभाव तसेच कारखान्यातील केमिकलयुक्त, रासायनिक द्रव्य समुद्रात सोडले जात असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर झाला आहे. माशांच्या प्रजाती दुर्मिळ झाल्याचे कोळीबांधव सांगत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे. रासायनिक व पेट्रोकेमिकल्स कारखान्यामधील सांडपाण्याची समुद्रामध्ये विल्हेवाट लावली जाते. त्यातून होणारे जलप्रदूषण कोळी समाजाला उद्ध्वस्त करत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पारंपरिक मासेमारी कोळीबांधवांना परवडत नाही. अत्याधुनिक व तंत्रयुक्त पद्धतीने मत्स्यव्यवसाय करावा तर सरकारची उदासीनता दिसून येत आहे. या विभिन्न समस्येवर महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने वारंवार आवाज उठवला आहे. मात्र, सरकार या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ही भयानक परिस्थिती ओढवली आहे.