| उरण | वार्ताहर |
राज्य शासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात मासेमारीवर बंदी लागू केली आहे. परंतु, मच्छिमार उरणच्या खोल समुद्रात मात्र बोटी धडधडीतपणे मासेमारी करताना दिसत आहेत. करंजा गावातील स्थानिकांकडून तब्बल 10 ते 15 बोटी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मासेमारीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती खात्रीलायक माहिती त्यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे पावसाळी मासेमारी फक्त कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले असून, सर्वसामान्यांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी चार बोटींवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पकडलेली मासळी लिलावात फक्त 55 हजारांमध्ये विकली गेली. म्हणजे प्रती बोट सुमारे 13 हजारांचीच मासळी सापडली, असा सरकारी दावा आहे. परंतु, एक बोट समुद्रात मासेमारीसाठी गेल्यास किमान 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. मग प्रश्न असा की, या लाखो खर्चाच्या बोटीवर सापडणारी मासळी फक्त काही हजारांचीच कशी? ज्यांनी लाखो खर्चून मासेमारी केली, ते एवढा तोटा सहन करून समुद्रात जातील का? त्यामुळे यामागे काळं आर्थिक साम्राज्य कार्यरत आहे, अशी चर्चा उरण तालुक्यात जोमात सुरू आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, कारवाई करताना मुद्दामून छोट्या बोटींवर लक्ष केंद्रित केले जाते आणि मोठ्या बोटींमधील मासळी आधीच सुरक्षितपणे काढून घेतली जाते. उरणमध्ये बंदीच्या काळात मासेमारी सुरू ठेवणाऱ्यांमागे नावाजलेल्या मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी आणि मत्स्यविभागातील काही भ्रष्ट अधिकारी सक्रिय असल्याचा ठाम आरोप त्यांच्याकडून होत आहे.






