मासेमारी नौकेची पाणबुडीला धडक; दोन खलाशांचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक बसून 21 नोव्हेंबरला झालेल्या अपघातप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याच्या समुद्राजवळ झालेल्या नौसेनेच्या पाणबुडी अपघातात मासेमारी बोटीवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीचे देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मासेमारी बोटीवरील तांडेल विरोधात यलो गेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक येथील कारवार बंदरातून भारतीय नौसेनेची आय.एन.एस. करंजा ही पाणबुडी 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पैरीस्कोप डेप्थ मेंटेन करुन गोव्याच्या तटावरुन वेगाने जात होती. दरम्यान पाणबुडीच्या उजव्या बाजूने एफ. व्ही. मारथोमा ही एक मासेमारी बोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दिसून आली, सदर मासेमारी बोट एका जागेवर उभी होती. प्रकाश  फार अंधुक असल्यामुळे समोरची बोट स्पष्ट दिसत नव्हती. दोन्ही बोटींमध्ये सुरक्षित अंतर राखून एन.एस. करंजा पाणबुडीने दिशा बदलून आपला वेग कायम ठेवला. पाणबुडीने मासेमारी बोटीपासून वाचण्याचे सर्व प्रयत्न करुनही ती मासेमारी बोट पाणबुडीला धडकली आणि समुद्रात पलटी होऊन बुडाली. ही धडक गोव्याजवळील अरबी समुद्रात रात्रीच्या सुमारास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मासेमारी बोटीवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला. या अपघातात बेपत्ता झालेल्या खलाशांचा मृतदेह 28 नोव्हेंबरला सापडला. यानंतर हे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात पाठवले असून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे. भारतीय नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मासेमारी बोट ऑटोमेटीक आयडेन्टीफिकेशन सिस्टम काम  करत नव्हते. त्यामुळे मासेमारी नौकेचा वेग, स्थान, दिशा, नाव समजून येत नव्हते. एफ. व्ही. मारथोमा या बुडालेल्या बोटीवरील दोन हरवलेल्या खलाशांची शोध मोहिम राबवताना दोन्हीही खलाशांचे मृतदेह मिळून आले. या अपघातात नौसेनेच्या पाणबुडीचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 11 खलाशांच्या दुखापतीला आणि दोन खलाशांच्या मृत्यूला कारणीभूत असल्यामुळे मासेमारी बोटीवरील तांडेल विरुद्ध यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी यलोगेट पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Exit mobile version