| उरण | प्रतिनिधी |
राज्य शासनाकडे करंजा मच्छीमार बंदराचा गाळ काढण्याचा व इतर तत्सम कामांचा 183 कोटी खर्चाचा प्रस्ताव मागील एक वर्षांपासून धुळ खात पडून आहे. त्यामुळे या बंदरातील गाळाच्या समस्येमुळे मच्छीमार पुरते हवालदिल झाले असुन करंजा बंदरात 300 मच्छीमार बोटी पुन्हा गाळात रुतून बसल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठी 256 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले करंजा मच्छीमार बंदर मागील वर्षभरापासून गाळाने भरण्यास सुरुवात झाली आहे. बंदरात मासळी उतरविण्यासाठी आलेल्या मच्छीमारांना ओहोटीच्या वेळी बंदरात अडकून राहावे लागते. त्यांना मासळी उतरवून पुन्हा बाहेर जाण्यासाठी चार-पाच तासांची वाट पाहावी लागते. त्यामुळे सुमारे 300 बोटी बंदरात अडकून पडतात. या गाळाच्या समस्येमुळे मासळी व्यावसायिक संकटात सापडले आहेत.






