अरबी समुद्रात पुन्हा वादळ; मच्छिमारी बोटी आगरदांडा-दिघी बंदराकडे

| मुरूड | प्रतिनिधी |
अरबी समुद्रात बुधवारी पहाटेपासून पुन्हा मोठे वादळ उठले असून उपरती वादळी वारे आणि पाऊस कोसळू लागल्याने खोल समुद्रातील परिस्थिती बिकट बनली आहे. खबरदारी म्हणून समुद्रात गेलेल्या मासेमारी नौका किनार्‍यावर येऊ लागल्या आहेत. खोल समुद्रात वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असून वेग वाढल्याने मच्छिमारांमध्ये घबराट उडाली आहे. ही सर्व अतिवृष्टीची लक्षणे असल्याचे ध्रुव गोपाळ लोदी, पांडुरंग आगरकर, ललित मढवी (सर्व रा. एकदरा) असे बुजुर्ग मच्छिमारांनी सांगितले.

मासेमारीस खोल समुद्रात गेलेल्या वेरावळ, बलसाड, गुजरात, महाराष्ट्रातील मासेमारी नौका मासेमारी अर्धवट सोडून वादळात सुरक्षितता म्हणून दिघी-आगरदांडा बंदराकडे येत असून त्यांचा हा आटापिटा मुरूड समुद्र किनार्‍यावरुन दिसून येत आहे. 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्यापासून मासेमारी अर्ध्यावर सोडून येण्याची ही चौथी वेळ आहे. यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मधल्या काळात छोट्या मच्छिमारांचा सीझन देखील मासळी मिळत नसल्याने वाया गेला. त्यात अतोनात नुकसान झाल्याची माहिती रोहन निशानदार( नाखवा) यांनी दिली.

समुद्रात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत असून लाटांचे तांडव वाढले आहेत. अशी माहिती पदमदुर्ग समुद्र परिसरात बुधवारी दुपारी मासेमारी करणार्‍या त्यांनी प्रत्यक्ष समुद्रातून बोलताना दिली.गुजरात राज्यातील नौकांनी वादळापासून बचाव करण्यासाठी आगरदांडा-दिघी बंदराचा आश्रय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनीही पश्‍चिम किनार्‍यावर अतिवृष्टीचा इशारा दिला असून, ऐन गणेशोत्सवात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडू लागला आहे.

Exit mobile version