। मुरूड । वार्ताहर ।
गेल्या आठवड्यापासून अरबी समुद्रात वादळी वारे वाहत असून समुद्रात लाटांचे तांडव सुरू आहे. ही परिस्थिती कमी जास्त होत असून आठवडाभर मासेमारी बंद राहिली आहे. सोमवारी गुजरात राज्यातील काही नौका मासेमारीस गेल्याचे दिसून आले. मात्र, मुरूड- एकदरा येथील मच्छिमारांनी वादळी वार्याचा आढावा घेऊन पुढील तीन दिवस समुद्रात मासेमारीस न जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मुरूड येथील हितेंद्र कुलाबकर, रणजित बळी, नरेंद्र सवाई यांनी दिली.
सोमवारी जवळपास 200 पेक्षा अधिक नौका आगरदांडा-दिघी बंदरात नांगरून उभ्या करण्यात आल्या होत्या. वादळाचा धोका टळला नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तरीही काही अतिउत्साही मच्छिमार मासेमारीस जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे धोकादायक आहे. वादळाचा इशारा हवामान खात्याकडून तसेच प्रसिद्ध हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. खोल समुद्रातील वादळ किनार्यावर दिसून येत नाही, असे या मच्छिमारांचे म्हणणे आहे.
सध्या हेटशी वादळी वारे समुद्रात वाहत आहेत. पाऊस, वारे, मोठया उसळत्या लाटा अशी स्थिती असल्याने मच्छिमारांनी धाडस करु नये, असे मत हवामान विभागच्या अधिकार्यांनी व्यक्त केले. तसेच पुढील 3 दिवस वादळाची द्रोणिय स्थिती कायम राहील, असे मत बुजुर्ग मच्छिमारांनी देखील व्यक्त केले आहे.