रायगडातील मासेमारी पूर्णतः ठप्प

मुंबईतदेखील बाहेरील राज्यातील मासळी
मनोहर बैले यांची माहिती

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
समुद्रात होत असलेले वाढते प्रदूषण, सातत्याने बिघडते हवामान आणि तत्सम कारणामुळे मासळी मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. मासळीच्या दुष्काळाचा फटका सर्वत्र बसला असून, रायगडातील मासेमारी जवळजवळ पूर्णतः ठप्प झाली असल्याची माहिती रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली.
मुंबईतदेखील अशीच परिस्थिती असून, बाहेरगावातून जेमतेम 30 ते 40 टक्के मासळी येत असून, रावस, सुरमई, पापलेट आदी मोठ्या मासळीचे भाव गगनाला भिडले असल्याचे श्री. बैले यांनी स्पष्ट केले. मार्केटमध्ये बांगडे, छोटी कोलंबी, काटेरी मासळी, खेकडे, बाहेरगावहून येणारी बर्फातील मासळी, सुकी मासळी असा प्रकार ऐन सिझनमध्ये पाहायला मिळत आहे. मुरूड जवळील राजपुरी किनार्‍यावर शनिवार पासून ओला जवळा मिळायला सुरुवात झाल्याची माहिती येथील मच्छिमार दिगंबर गिदी यांनी दिली. परंतु, सिझन असूनही जवळ्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले. मोठी मासळी नसल्याने जवळ्याचे महत्त्व वाढले आहे.
पावसाळ्या आधी शेवटच्या मासेमारी सिझनमध्ये वाट पाहणार्‍या मच्छिमार बांधवांच्या पदरात यामुळे निराशाच पडल्याचे दिसून येते. कोकण किनारपट्टीवर मासळीचे दुष्काळी अरिष्ट असल्याची माहिती रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून राजपुरी येथील दिगंबर गिदी यांना मिळत असून, ताज्या मासळी खाण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात निराशा होऊ शकते. अधिक माहिती घेता कळते की, गुजरात, केरळ राज्यात मासळीचा फारसा दुष्काळ जाणवलेला नाही. गुजरात राज्यातील भावनगर, पोरबंदर, वेरावळ आणि समुद्र किनारपट्टीवर मासळी मिळण्याचे प्रमाण सम प्रमाणात स्थिर आहे, अशी माहिती राजकोट येथून मिळत आहे.

समुद्रात येणार्‍या नैसर्गिक आणि अनैसर्गिक परिस्थितीला कोकणातील तमाम मच्छिमार मंडळीना तोंड द्यावे लागत असून, मासळीचे प्रमाण घटल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यात घरच्या आणि खलाशी मंडळींचे आर्थिक नियोजन कसे करायचं याची चिंता लागून आहे. – मनोहर बैले, अध्यक्ष, मच्छिमार कृती समिती

लिलावासाठी मासळी उपलब्ध होत नसल्याने मासळीची जर-तर परिस्थिती आहे. म्हणजे, मासळी आलीच तर त्याचे भाव हजाराच्या पटीत अटकेपार आहेत. ग्राहकांना परवडत नाहीत. ते आमच्यावर तोंडसुख घेतात. प्रत्यक्षात मोठी मासळी नसल्याने लिलाव महागल्याने आमचा नाईलाज आहे. – वर्षा पाटील, मासळी विक्रेत्या, नवी मुंबई

Exit mobile version