आठव्यांदा तीन नंबरचा बावटा; जलवाहतूक सेवाही कोलमडली
| चिरनेर | प्रतिनिधी |
वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मागील दोन महिन्यांपासून सलग आठव्यांदा धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मासेमारीसह गेटवे -एलिफंटा, गेटवे -जेएनपीए, गेटवे-मांडवा, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी शनिवारपासूनच (दि.27) पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.
वादळी वारे, खराब हवामान आणि अतिवृष्टीचा फटका राज्यातील मच्छीमारांना मागील दोन-तीन महिन्यांत सलग आठव्यांदा बसला आहे. शनिवार पासुनच (27) धोक्याचा इशारा देण्यात येणारा तीन नंबरचा बावटा विविध बंदरात लावण्यात आला आहे. यामुळे राज्यातील मासेमारी ठप्प झाली आहे. तीन नंबरच्या बावट्यामुळे कसारा, ससुनडॉक, करंजा आणि राज्यातील विविध बंदरात हजारो मच्छीमार बोटींनी नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये करंजा बंदरातील सुमारे 400 बोटींनी नांगर टाकला आहे. अशी माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली.
तीन नंबरच्या बावट्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, गेटवे-मांडवा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शनिवारपासूनच बंद करण्यात आली असल्याचे गेटवे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी इक्बाल मुकादम यांनी सांगितले. तर मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही शनिवारपासूनच बंद करण्यात आली असल्याची माहिती भाऊचा धक्का येथील बंदर विभागाचे निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली. यामुळे सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली आहे.
मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
मागील दोन -तीन महिन्यांपासून विविध प्रकारची वादळे, अतिवृष्टी, खराब हवामानामुळे मासेमारी सलग आठ वेळा बंद ठेवावी लागली आहे. मासेमारी हंगामातच मासळी व्यवसाय सातत्याने बंद ठेवण्याची दुदैवी पाळी येऊन ठेपल्याने मच्छीमारांना लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच कृषीचा दर्जा दिलेल्या राज्यातील सर्वच मच्छीमारांनाही शासनाने तातडीने आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणीही करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केली आहे.
रस्त्यावर साचले पावसाचे पाणी
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उरण परिसरातील जासई उड्डाणपूलाच्या सर्व्हिस रोड, जासई-गव्हाणफाटा, जेएनपीए-पळस्पे राष्ट्रीय महामार्गावरील जेएसडब्लू कंपनी समोर, नवघर व परिसरातील अन्य ठिकाणच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र उरण व जेएनपीए परिसरात वाहतूक कोंडींची समस्या निर्माण झाली नसल्याचे उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे वपोनि अतुल दहिफळे व जेएनपीए वाहतूक नियंत्रण विभागाचे वपोनि जी.एम.मुजावर यांनी सांगितले.







