जेलिफिशमुळे मासेमारी धोक्यात

कोळी बांधव हवालदिल

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

गेल्या 15 दिवसांपासून मुरुडच्या समुद्रात सुरू असलेली कोलंबी मासेमारी अचानक जेलिफिश आल्याने ठप्प झाली असल्याची माहिती एकदरा गावचे मच्छिमार नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. बुधवारी कोलंबी मासेमारीस गेलेल्या येथील सुमारे 20 नौका मोठ्या प्रमाणात जेलिफिश मिळाल्याने किनार्‍यावर रिकाम्या हाताने परतल्याचे निशानदार यांनी सांगितले. यामध्ये रोहन निशानदार यांच्या नौकेचादेखील समावेश आहे. कोलंबी, बोंबील मासळी जेमतेम 20 टक्केच मिळाली आहे. जेलिफिशमुळे मासेमारी धोक्यात आल्याने कोळी बांधव हवालदिल झाले आहेत.

मुरूड समुद्रात सध्या कोलंबी मासळीचा हंगाम सुरू आहे. चैती, टायनी या जातीची कोलंबी मच्छिमारांना मिळत असल्याने येथील नौका कोलंबी मासेमारीस जात होत्या. मात्र, बुधवारी (दि. 27) मासेमारीसाठी गेलेल्या नौकांच्या जाळ्यात कोलंबीऐवजी जेलिफिश मोठ्या प्रमाणात आल्याने मच्छिमारांना धक्काच बसला. एकूण परिस्थितीचा अंदाज घेत मच्छिमार मेहनत आणि नुकसान सहन करीत किनार्‍यावर परतले. मागील वर्षीदेखील अशीच मोठ्या प्रमाणात समुद्रात जेलिफिश उठल्याने मासेमारी ठप्प झाली होती.

आरोग्यासाठी हानिकारक
जाळ्यात सापडलेली जेलिफिश साफ करुन समुद्रात फेकणे म्हणजे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक असते. याचा डोळ्यांना चुकून स्पर्श झाला तर दोन-तीन दिवस डोळ्यांचा दाह कमी होत नाही. शरीराला अन्य कुठेही स्पर्श झाला तरीही दाह होतो. किमान 48 तास तरी दाह कमी होत नाही, अशी माहिती निशानदार यांनी दिली. ही मासळी कुणीही खात नाही. समुद्रात जेलिफिश कोलंबी मासळी सहजतेने फस्त करून फडशा पाडते.

मुरूड समुद्रात जेलिफिश आल्याने गुरुवारी एकदरा-मुरूड भागातील नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या नाहीत. असा प्रकार किती दिवस राहील याचा अंदाज येत नाही. मात्र, यामुळे कोलंबीच्या हंगामात मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

रोहन निशानदार,
मच्छिमार

Exit mobile version