विजेच्या धक्क्याने पाच गुरे दगावली

मुरुड तालुक्यातील दुर्घटना
| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड शहरानजीक मोकळ्या जागेत चरत असताना विद्युत वाहिनीच्या झटक्याने पाच गुरांचा जागीच मृत्यू झाला. त्यात चार म्हशी आणि एका गायीचा समावेश आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

मुरुड तालुक्यातील भोगेश्वर पाखरी येथील जयेंद्र भायदे हे संजीवनी आरोग्य केंद्राच्या जवळील मोकळ्या डोंगर भागात गाय व म्हशींना घेऊन चरण्यासाठी गेले होते. चारा खाताना या गुरांना अचानक विदयुत वाहिनीचा झटका लागला.यामध्ये एक गाय व चार म्हशींचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकरी भायदे यांना बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, महावितरण व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

रोज 120 लिटर दूध मला या जनावरांपासून मिळत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. महावितरणच्या गलथान कारभारामुळे आज संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

जयकांत भायदे, शेतकरी

या घटनेचे दुःख आहे. धीर सोडू नका. भरपाई मिळून देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. तरी लवकरात लवकर ही भरपाई दिली जाईल. अधिकाऱ्यांना शहरातील सर्व वाहिन्या पुन्हा तपासण्यास सांगितले आहे. जिकडे थोडातरी धोका जाणवत असेल त्याठिकाणी नव्याने लाईन व्यवस्थित केल्या जातील.

कृष्णा सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता

महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे एका गरीब शेतकऱ्याच्या जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. हे नुकसान भरून न निघण्यासारखे आहे. मात्र शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी आहे.

राहील कडू, उपाध्यक्ष, शेकाप पुरोगामी संघटना मुरुड
Exit mobile version