अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना आव्हान देणारी अनेक शिखरं तसेच सुळके आहेत. त्यापैकी सर्वात अवघड समजला जाणारा सुळका म्हणजे वजीर! या सुळक्यावर अलिबागच्या पाच गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करीत तिरंगा फडकाविला आहे.
माहुली गडाशेजारी असलेल्या सुळक्यापैकी बुद्धिबळातील वजीर सोंगटीच्या आकाराचा सुळका म्हणजे वजीर. अडीचशे फुटाचा हा सुळका गिर्यारोहकांना नेहमीच खुणावतो. नाशिक येथील पॉईंट ब्रेक अॅडव्हेंचर संस्थेने जागतिक गिर्यारोहण दिनानिमित्त वजीर आरोहण मोहीम दि 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत अलिबागमधील 5 हौशी गिर्यारोहकांना सहभाग नोंदवून चढाई पूर्ण केली. या मोहिमेत थळ येथील संकेत कृष्णा साळुंके, सुरज पलंगे, अलिबाग येथील मंदार सिनकर, पंतनगर येथील दत्तात्रय थळे यांच्यासोबत ईशान थळे हा 9 वर्षाचा गिर्यारोहक सहभागी झाला होता. या मोहिमेत महाराष्ट्र भरातून जवळपास 28 गिर्यारोहक सहभागी झाले होते. जॉकी साळुंके यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.