एसटीला पावणेपाच कोटीचे उत्पन्न

दिवाळीत चार लाख 23 हजार महिलांनी केला प्रवास

| अलिबाग | प्रमोद जाधव |

दिवाळीच्या निमित्ताने नऊ लाख 53 हजार 473 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला. त्यात चार लाख 23 महिलांचा समावेश आहे. यातून एसटीला चार कोटी 76 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

एसटी महामंडळ रायगड विभागात अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, महाड, श्रीवर्धन या आठ आगारांचा समावेश असून 19 बस स्थानके आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांसह रायगड जिल्ह्यात पर्यटक येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई, बोरीवली ठाणेकडे जाणाऱ्या व पनवेलकडून अलिबागकडे येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी विनाथांबा पनवेल मार्गावर जादा गाड्यांची सोय केली होती. त्याचा फायदा प्रवाशांना चांगला झाला.

दिवाळीमध्ये 11 ते 19 नोव्हेंबर या नऊ दिवसाच्या कालावधीत नऊ लाख 53 हजार प्रवाशांनी प्रवास केला. यातून सुमारे चार कोटी 76 लाख रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी दिली.

ऑक्टोबरमध्ये 18 कोटीचे उत्पन्न
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून एसटीला एका महिन्यात 18 कोटी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Exit mobile version