विंधन विहिरींमुळे पाऊण कोटी वाया

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात 268 विंधन विहिरींची खोदाई करण्यात आली होती. यावर 2 कोटी 61 लाख 90 हजार रुपये खर्च केले गेले. यापैकी 110 विहिरी कोरड्या आहेत. यामुळे प्रस्तावित खर्चापैकी पाऊण कोटी वाया गेले आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश भाग कातळयुक्त आहे. सरासरी साडेतीन हजार पाऊस पडूनही मोठ्या प्रमाणात पाणी नदीनाल्यातून वाहून जाते. यामुळे दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सुमारे 300 ते 400 वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतात. गतवर्षी जिल्ह्यातील 152 गावांतील 268 वाड्यांमध्ये प्रत्येकी एक अशा 268 विंधन विहिरींची खोदाई प्रस्तावित होती. विहिरींच्या खोदाईसाठी मनुष्यबळ तसेच खोदाईचा खर्चही जास्त होतो. हे टाळण्यासाठी विंधन विहिरींची खोदाई करण्यात येते. मात्र, विहिरींपेक्षा विंधन विहिरींवर खर्च कमी येत असल्याने अगदी कमी जागेतही त्यांची खोदाई करता येते. यामुळे आता जिल्ह्यात विहिरींऐवजी विंधन विहिरींची खोदाई करण्यात येते. मात्र, अनेकदा विंधन विहिरींना पाणीही लागत नाही. यामुळे खोदाई करण्याचा खर्च वाया जात आहे.

Exit mobile version