न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर पाच दिवसांनी कारवाई ; खेळपट्टी असमाधानकारक

| दुबई | वार्ताहार |

सर्वांत कमी वेळेत संपल्यामुळे चर्चेत आलेल्या केपटाऊनमधील न्यूलँड्स येथील भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यातील खेळपट्टीबाबत आयसीसीला शेरा मारण्यासाठी पाच दिवस लागले. ही खेळपट्टी असमाधानकारक होती असे आयसीसीने मंगळवारी जाहीर केले.

जेमतेम दीड दिवस चाललेली ही कसोटी कमीत कमी षटकांची (642 चेंडू) झाली. या दीड दिवसात दोन्ही संघांचे मिळून 34 फलंदाज बाद झाले. तरीही भारताने शानदार विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.

सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी मैदानावरील पंचांनी व्यक्त केलेली चिंता त्यानंतर रोहित शर्मा आणि डीन एल्गर या दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा केल्यानंतर आपला अहवाल तयार केला आणि तो आयसीसीला सादर केला. ही खेळपट्टी दर्जाहीन होती, असे दोन्ही कर्णधारांनी म्हटले होते. खेळपट्टीसाठी असलेल्या गुणांकनातील एक गुण कमी करण्याची कारवाई आयसीसीने केली.

न्यूलँडस्ची ही खेळपट्टी फलंदाजीस फारच आव्हानात्मक होती. चेंडू अचानक उसळत होते. पूर्ण सामनाभर धोक्याची घंटा वाजत होती. परिणामी फटके मारणेही कठीण जात होते. काही फलंदाजांच्या ग्लोव्हजला चेंडू लागले. चेंडूच्या अनपेक्षित उसळीमुळे अनेक फलंदाज बाद झाले, असे सामनाधिकारी ब्रॉड यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. आयसीसीकडून कारवाईत मिळालेला एक वजा गुण पुढे जाऊन त्या मैदानासाठी घातक ठरू शकतो.

काय म्हणाला होता रोहित शर्मा
न्यूलँडस्ची खेळपट्टी फलंदाजीस धोकादायक होती, तरी भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याचा बाऊ केला नाही. उलटपक्षी त्याने आयसीसीसह सर्वांना सुनावले होते. जोपर्यंत भारतीय खेळपट्ट्यांबाबत आपली तोंडे बंद ठेवत नाही, तोपर्यंत अशा खेळपट्ट्यांवर खेळायला आम्हाला हरकत नाही. आम्ही येथे क्रिकेट खेळायला येतो. आव्हाने किती असली तरी ती स्वीकारतो. कारणे देत नाही. भारतातील खेळपट्ट्यांवर पहिल्या दिवसापासून चेंडू फिरकी घेऊ लागला की ओरड केली जाते.
Exit mobile version