चिंचोळळा गल्ल्यांमध्ये उपयुक्त
। नवी मुंबई । वार्ताहर ।
निर्णायक क्षणी आगीच्या ठिकाणी पोहचता आले तर आगीवर नियंत्रण मिळविण्यात येऊन यश मिळू शकते. यासाठी नवी मुंबई अग्निशमन दलात आता फायर बाईक दाखल झाल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर पाच वाहने घेण्यात आली असून गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. 40 लिटर पाण्याची टाकी, एक चालक व एक आग नियंत्रक कर्मचारी या वाहनावर आगीच्या ठिकाणी तत्काळ पोहचू शकतो. आगीची घटना घडल्यानंतर सुरुवातीची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. या वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले नाही तर आग रौद्र रूप धारण करीत प्रचंड हानी होते, अनेकदा जीवही जातात. नेमक्या याच वेळेत आगीवर नियंत्रण येणे आवश्यक असते. मात्र शहरांतील वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन वाहने दुर्घटनेच्या ठिकाणी वेळेत पोहचत नाहीत.
यावर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने फायर बाइक घेतल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पाच वाहने घेतली आहेत. निर्णायक क्षणी घटनास्थळी पोहचणे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम ही वाहने करणार आहेत. तसेच अरुंद भागात आग लागल्यास ही वाहने घटनास्थळी पोहचू शकणार आहेत. खास करून गावठाण, झोपडपट्टी भागात आगीच्या घटना घडल्यास या वाहनांची मोठी मदत होणार आहे.