इंग्लंडच्या अजिंक्यपदाची विजयी सुरूवात
| लंडन | वृत्तसंस्था |
इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेला अत्यंत रोमांचक सुरूवात झाली. लीड्समधील हेडिंग्लेमध्ये झालेला पहिला सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत रंगला. शेवटच्या सत्रापर्यंत दोन्ही संघात चुरस पाहायला मिळाली. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर चौथ्या डावात 471 धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले होते. अखेर इंग्लंडने पहिल्या कसोटीत 5 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत जागतीक कसोटी अजिंक्यपद 2025-27 स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली आहे. भारताचा नवा कोरा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी या सामन्यात पाच फलंदाजांनी शतकी खेळी केली होती. तरीदेखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताच्या ‘नव्या गड्याचे नवे राज्य’ ढासळलले असल्याचे बोलले जात आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम भारतीय संघाला फंलंदाजीसाठी पाचारण केले होते. यादरम्यान यशस्वी जयस्वालने 101 धावांची खेळी केली, तर केएल राहुल 42 धावांवर बाद झाला. साई सुदर्शन आपल्या कसोटी पदार्पणात शून्यावर तंबूत परतला. आपल्या कर्णधारपदाच्या पदार्पणात शुबमन गिलने 147 धावांची शानदार खेळी केली, तर पंतनेही 134 धावांचे योगदान दिले. या 3 शतकांच्या जोरावर भारतीय संघ 471 धावांपर्यंत पोहोचू शकला. पहिल्या डावात भारताचे शेवटचे 6 फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.
इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला, तेव्हा जॅक क्रॉलीला पहिल्याच षटकात परतला. मात्र, बेन डकेटच्या 62 धावा आणि ओली पोपच्या 106 धावांच्या जोरावर इंग्लंडने दमदार पुनरागमन केले. हॅरी ब्रूकने 99 धावांवर बाद झाला. त्यानंर जेमी स्मिथच्या 40 धावा आणि ख्रिस वोक्सच्या 38 धावांच्या खेळीमुळे इंग्लंड 465 धावांपर्यंतच पोहोचला. यावेळी जसप्रीत बुमराहने 5 बळी घेतल्या, तरीही भारताला फक्त 6 धावांचीच आघाडी मिळाली.
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, करुण नायर अपयशी ठरले. साई सुदर्शनने यावेळी 30 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने खूप संयमाने 137 धावांची खेळी केली. तसेच, रिषभ पंतने या सामन्याच्या दोन्ही डावांत शानदार शतक झळकावले. असे करणारा तो कसोटी इतिहासातील केवळ दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर पंतने याच सामन्यात भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके बनवण्याचा एमएस धोनीचा विक्रम देखील मोडीत काढला. या डावात भारताने 364 धावा केल्या असल्याने पहिल्या डावातील 6 धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 5 गडी राखत इतिहास रचला. इंग्लंडने आपल्याच देशात यशस्वीरित्या पाठलाग केलेली ही दुसरा सर्वात मोठी धावसंख्या आहे. बेन डकेटच्या 149 धावा आणि जॅक क्रॉलीच्या 65 धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या बळीसाठी 188 धावांची भागीदारी रचली होती. ओली पोप आणि हॅरी ब्रूक अपयशी ठरले. मात्र, जो रूटने नाबाद 53 धावा करून इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयात खूप मोठे योगदान दिले.
यानंतरचा दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना दि.2 ते 6 जुलै दरम्यान एजबेस्टन बर्मिंगहॅम या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यामुळे भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करतो की नाही? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
इंग्लंडचा सर्वोच्च पाठलाग
भारताने दिलेले 371 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासोबतच इंग्लंडने मोठा विक्रमही केला आहे. लीड्समधील हेडिंग्ले मैदानात झालेल्या कसोटीतील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च यशस्वी धावांचा पाठलाग ठरला आहे. तसेच, इंग्लंडचा या मैदानातील हा सर्वोच्च धावांचा पाठलाग आहे. या मैदानात सर्वात मोठे लक्ष्य पार करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 77 वर्षांपूर्वी 1948 साली इंग्लंडविरुद्ध याच मैदानात 404 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.






