। नंदुरबार । प्रतिनिधी ।
नंदुरबार तालुक्यात शनिवारी (दि. 02) रात्री 8 च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. एका वेगवान बोलेरोने दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
नंदुरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ शनिवारी (दि. 02) रात्री 8 च्या सुमारास एक दुचाकी बंद पडली. अंधार असल्याने दुचाकी स्वाराच्या मदतीसाठी अजून दोन दुचाकी त्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्याचवेळी नंदुरबारकडून धानोराकडे जाणाऱ्या एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला त्या उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन दुचाकींचे नुकसान झाले असून बोलेरो गाडीही उलटली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. तसेच याप्रकरणी नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.