। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरूड काशिद बीच येथे ड्युटीवर हजर असणार्या पोलिसाला दारूच्या नशेत असणार्या आरोपींनी मारहाण केल्याप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
फिर्यादी पो कॉ. समीर परशुराम म्हात्रे, मुरूड काशिद बीच येथे दि.6 एप्रिलला बंदोबस्त ड्युटीकरिता हजर असताना रमेश लिंबाजी डफळ, बबन लिंबाजी डफळ, सुभाष गुणाजी वेळकर, अक्षय दिलीप गायकवाड, आतिष विठ्ठल गायकवाड सर्व रा. ता. हवेली, जि. पुणे हे पाच आरोपी दारु पित होते. सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास मनाई असल्याचे पोलिसाने सांगितले. त्या बोलल्याचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पो. कॉ. सागर रसाळ हे सदर भांडण सोडविण्याकरिता गेले असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अलिबाग रायगड तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व अति सत्र न्यायाधीश जयदिप मोहिते यांनी महत्वपूर्ण निकाल देत आरोपींना शिक्षा ठोठावली. या खटल्यात अति शासकीय अभियोक्ता स्मीता धुमाळ – पाटील यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला. आरोपीत मद्यधुदांना सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे.
पोलिसाला मारहाण प्रकरणी पाच तळीरामांना कारावास
