जेलिफीशचे प्रमाण घटल्याने मच्छिमार खुष
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेल्या काही दिवसांपासून जेलिफीशमुळे मासेमारीवर संकट आले होते. आता मात्र जेलिफीशचे प्रमाण कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात कोळंबी सापडत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल पाच टन कोळंबी सापडल्याने कोळंबीचा हंगाम पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येते. एकदरा येथील सुमारे 40 ते 50 नौका मासेमारी करण्यासाठी गेल्या होत्या. मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात कोळंबी सापडत आहे, अशी माहिती एकदरा गावचे रोहन निशानदार यांनी दिली. सध्या चैती आणि टायनी या जातीची लाल कोलंबी पदमजदुर्गजवळील समुद्रात मिळत आहे. एकदरा आणि मुरूडचे मच्छिमार पहाटेच मासेमारीसाठी जात आहेत. प्रत्येक नौकेला किमान 50 ते 60 किलो कोलंबी मिळत आहे, तरीही नेहमीच्या हंगामानुसार हे प्रमाण निम्मेच असल्याचे काही मच्छिमारांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात समुद्रात जेलिफिश उसळल्याने मासेमारी ठप्प होऊन नौका किनाऱ्यावर परतल्या होत्या. सध्या हवामान निरभ्र असल्याने पुढच्या काळात मुरुड, एकदरा राजपुरी येथील नौकांना कोळंबीची आवक मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता स्थानिक मच्छिमार व्यक्त करत आहेत. कोळंबी स्थानिक बाजारात विकली जात आहे, तर काही कोलंबी सुकवून तिचे सोडे बनवले जात आहेत. बाजारात सोड्यांना किलोला बाराशे रुपये मिळतात. त्यामुळे सोडे सुकवण्याकडे कल वाढला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सांगली, सोलापूर येथील पर्यटक मुरुडमधील सोडे विकत घेतात. त्यामुळे स्थानिकांची चांगली आर्थिक उलाढाल होते.