सांगवी गावाला संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर
| नेरळ | प्रतिनिधी |
भूगर्भ शास्त्राच्या अहवालाने कर्जत तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रांमध्ये पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. गेली तीन वर्षे सातत्याने या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, त्यातील केवळ सांगवी या गावाच्या मागे 100 मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधण्यासाठी 57 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, आपत्कालीन व्यवस्थापनाकडून हा निधी मंजूर झाल्याने सांगवी गावाच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
कर्जत तालुक्यातील पाच गावे दरडग्रस्त असल्याचे भूगर्भ शास्त्राच्या सर्व्हेमधून निश्चित झाले आहे. त्यात कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीतील सांगवी, अंभेरपाडा ग्रामपंचायतीतील तुंगी, नेरळ ग्रामपंचायतीतील आनंदवाडी, उमरोली ग्रामपंचायतीतील पाली वसाहत व कर्जत नगरपरिषदेतील कचेरी येथील मुद्रे या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने यापूर्वी सूचना देणाऱ्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र, स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने दरड कोसळणार असलेल्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधाव्यात, अशी मागणी केली जात आहे. परंतु, शासनाकडून केवळ सांगवी गावासाठी 57 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित आदिवासी वाडी व रहिवाशी वस्त्यांना देखील संरक्षण भिंतीची अपेक्षा लागून राहिली आहे.