। नागोठणे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील जिते-कुंबळमाच येथील सुपुत्री व सध्या गोरेगाव मुंबई येथे राहत असलेली 5 वर्ष वयाची चिमुकली शनया काळे या मुलीने बालदिनाच्या दिवशी दि.14 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील हरिहर हा किल्ला सर करून बालपणीच ट्रेकिंग क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. 200 फुट उंची वरील, तीव्र आणि सरळ चढाव असलेला आणि जवळपास कातळात कोरलेल्या 117 पायर्या असलेला हा किल्ला शनया हिने लीलया सर केला. याबाबत शनयाचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे. शनया हिला तिचे मामा साऊ सफर ट्रेकिंग ग्रुपचे संचालक सुरेश पोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शनया हिला बाल वयापासूनच गडकिल्ल्यांबद्दल आकर्षण असून तिने आतापर्यंत 2 वेळा रायगड किल्ला पायी सर केला आहे. यासोबतच शनयाने लहान मोठे ट्रेक सुद्धा केले आहेत. बालदिनाच्या दिवशी हरिहर किल्ला सर करण्यासाठी आधीपासूनच शनयाची तयारी करण्यात आली होती. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने हेल्मेट, ऐल्बो आणि लेग गार्ड, रोप, मेडिसिन या सगळ्या वस्तूंची तयारी शनयाचे मामा सुरेश पोळेकर यांनी केली होती.