माथेरानमध्ये स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून ध्वजारोहण

| नेरळ | वार्ताहर |

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या बीजे रुग्णालयात ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन असल्याने बीजे रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सेवा बजावत असलेले कर्मचारी सखाराम सांबरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सखाराम सांबरी यांच्या सारख्या सामान्य कामगाराला ध्वजारोहण करण्याची संधी दिल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मिसाळ यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला सन्मान देण्याचे निर्णय घेतला आणि सफाई कामगार सखाराम सांबरी यांना ध्वजारोहण करण्याची संधी दिली. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आज शासकीय कार्यलयात ध्वजारोहण केले गेले. लोकसभा निवडणूक असल्याने राजकीय व्यक्ती किंवा माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे पदाधिकारी यांचे हस्ते ध्वजारोहण केले जाणार नव्हते. त्यामुळे माथेरान पालिकेच्या बीजे रुग्णालयात नियमाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांचे हस्ते धवजरोहण होणे अपेक्षित होते. मात्र, माथेरान डोंगरातील आसलवाडी येथून चालत सखाराम हे माथेरान गाठतात. साधारण दररोज आठ किलोमीटरची पायपीट करून तेे आपल्या सेवेच्या ठिकाणी बीजे रुग्णालयात पोहचतात. सांबरी हे माथेरान पालिकेच्या रुग्णलयाला आपले घर समजून स्वच्छतेची कामे करतात. कर्तव्यावर असताना सखाराम सांबरी हे रुग्णालयात सेवा बजावताना आपली सेवेची वेळ न पाहता कितीही उशीर झाला तरी त्याबद्दल कोणतीही कुचराई किंवा टाळाटाळ करत नाहीत.

त्यामुळे कामगार दिनाचे औचित्य साधून माथेरानमधील बीजे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. मिसाळ यांनी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्याची संधी सखाराम सांबरी यांना दिली. त्यावेळी बीजे रुग्णलयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version