| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुडमध्ये बुधवारी (दि. 31) जंजिरा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघातर्फे आझाद चौकात मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुरुड येथील आझाद चौकात झालेल्या कार्यक्रमास नायब तहसीलदार संजय तवर, रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे, मुरुड शहरातील नागरिक तसेच सर एस.ए उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, व्यापारीवर्ग तसेच माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 13 वर्षांपासून जंजिरा मुक्तीसंग्राम दिन साजरा करीत आहे. मुरूड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांत नबाबांचे जंजिरा संस्थान होते. नबाब हे अत्यंत न्यायप्रिय व प्रजाहित दक्ष होते. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असत. भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांनांमध्ये विखुरलेला होता. 565 संस्थाने होती. हैदराबाद, काश्मीर, जुनागड, जंजिरासारख्या संंस्थानिकांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी करायला खळबळ केली. मात्र, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी वटहुकूम जारी करुन संस्थांनिकांना भारतात विलीनीकरणास भाग पाडले. जंजिरा संस्थान 31 जानेवारी 1948 रोजी स्वतंत्र झाले. सिद्दी नबाबाने सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली.
रक्ताचा एक थेंबही न सांडता जंजिरा संस्थान विलीन झाले. हा इतिहास नव्या पिढीला कळणे गरजेचे आहे. नानासाहेब पुरोहित, हरिभाऊ भडसावळे, मोहनधारिया, गोविंद लिमये, राजाभाऊ चांदोरकर, दतात्रय कुंटे, सदाशिव बागाईतकर, केशवराव खांबेटे आदी मंडळींनी जंजिरा व भोर संस्थाने विलीनीकरण करण्यासाठी तीव्र लढा देऊन मोलाची कामगिरी केली आहे. मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिन मुक्तीसंग्राम दिन शासकीय पातळीवर साजरा केला जातो, त्याचप्रमाणे 31 जानेवारी हा दिन शासकीय पातळीवर जंजिरा मुक्तीसंग्राम दिन साजरा व्हावा, अशी पत्रकार संघाची मागणी आहे. शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. जंजिरा मुक्तीसंग्राम दिन हा लोकोत्सव व्हावा, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे म्हणाले की, जंजिरा मुक्तीसंग्राम दिन शासकीय पातळीवर साजरा व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन पाठविले असून, येत्या महिनाभरात रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. शासकीय पातळीवर मुक्तीसंग्राम दिन साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा त्यांनी केला.
आझाद चौक येथील ध्वजवंदनासाठी नाईक महाविद्यलयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर, वासंती उमरोटकर, प्रमोद भायदे, स्नेहा पाटील, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, मनोज पुलेकर, सतेज निमकर, युगा ठाकूर, संदीप पाटील, अजित गुरव, अरविंद गायकर, श्रीकांत सुर्वे, रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, मनोहर मकु, डॉ. राज कल्याणी, सर्व अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.