पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचा सूर
| उरण | प्रतिनिधी |
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटप्लिक्सवर स्ट्रीम होत असलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ नावाच्या चित्रपटात पक्ष्यांच्या जवळ धोकादायकपणे फ्लेमिंगो शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
नवी मुंबईतील फ्लेमिंगो शहरातील टीएस चाणक्य येथे फ्लेमिंगोचे दृश्य चित्रित करण्यात आले होते. नॅटकनेक्ट फाऊंडेशनने याविषयी मॅग्रोव्ह सेल आणि महाराष्ट्र मुख्य वन नियंत्रक यांच्याकडे तक्रार केली आहे. फ्लेमिंगोचे दृश्य टाईम लाईनमध्ये पाणथळीवर विसावलेल्या फ्लेमिंगोवर उडताना स्पष्ट दिसते. हे दृश्य ड्रोनद्वारे चित्रित केले जाते, असे नॅट कनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी सांगितले. चित्रपटात फ्लेमिंगोचे सौंदर्य दाखवण्यास आमचा काही आक्षेप नाही. परंतु, विश्रांती घेणार्या पक्ष्यांवरून उडणार्या ड्रोनचा वापर नक्कीच अक्षेपार्ह आहे, असेही कुमार म्हणाले.
दरम्यान, धारदार ब्लेडसह ड्रोन मोठा आवाज करतात. ज्यामुळे विश्रांती घेणार्या पक्ष्यांना त्रास होतो. आणि, फ्लेमिंगो फ्लाईंग मशीनच्या संपर्कात आल्यास ते गंभीर जखमी होऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. मॅगोव्ह सेलने यापूर्वी नॅट कनेक्ट आणि सहकारी पर्यावरण गटांच्या तक्रारीनंतर टीएस चाणक्य वेटलँडवर ड्रोन शूटच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्हशन ऑफ नेचरमधील फ्लेमिंगोंची संख्या असुरक्षिततेच्या जवळ असलेल्या लाल यादीत आहे. आणि, म्हणूनच त्याची काळजी घेणे आणि त्यांना पुढील धोक्यात न आणणे हे मानवाचे कर्तव्य आहे, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.
पर्यावरणवाद्यांची मोहीम
पर्यावरणवाद्यांनी हा गंभीर मुद्दा नेटप्लिक्स आणि चित्रपट निर्माते तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त, एनआरआय पोलीस ठाणे आणि सिडको यांच्याकडे कायदेशीररित्या मांडण्याची विनंती केली आहे. सतत धोक्यात असलेल्या शहराच्या जैवविविधतेचा एक भाग म्हणून पर्यावरण, फ्लेमिंगो आणि त्यांचे निवासस्थान वाचविण्यासाठी मोहीम राबवत आहेत.