पुराच्या रौद्ररूपाने महापुराच्या आठवणी जाग्या; संपूर्ण गावात चिखलाचे साम्राज्य
| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी |
अंबा नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जांभूळपाडा गावाने यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना केला. पुराच्या रौद्ररूपाने गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, 1989 च्या महापुराच्या भयावह आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. गावभर पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून प्राथमिक अंदाजानुसार कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या महापुरात जांभूळपाडा ग्रामपंचायत कार्यालयाला सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे पाणी थेट ग्रामपंचायत कार्यालयात घुसल्याने संपूर्ण कार्यालय चिखलाने भरून गेले. महत्त्वाची कागदपत्रे, अभिलेख आणि दप्तर भिजल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून, ग्रामपंचायत कार्यालयाच्या संरक्षणासाठी उभारलेली संरक्षक भिंतही पुराच्या प्रचंड प्रवाहात कोसळली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कार्यालय पुन्हा सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पुराच्या तडाख्यात राजिप शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना यांनाही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने साहित्य, फर्निचर आणि इतर शासकीय मालमत्ता खराब झाली आहे. दरम्यान, गावातील अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने पुराच्या पाण्यात अडकली, तर अनेक दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेती, जनावरे, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांनाही मोठा फटका बसला आहे.
पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांकडून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध विभागांकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून ग्रामपंचायत कार्यालयासह सर्व शासकीय इमारतींची दुरुस्ती, तसेच बाधित नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जांभूळपाड्यातील या महापुराने केवळ मालमत्तेचेच नव्हे, तर ग्रामस्थांच्या मनातही भीतीचे सावट निर्माण केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, असा महापूर 1989 नंतर प्रथमच पाहायला मिळाला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
