सत्ताधाऱ्यांकडून ड्रग्सच्या पैशाचा महापूर: हर्षवर्धन सपकाळ

| मुंबई | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे वाटोळे होत असल्याची नवनवी उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीचे घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचा महापूर आणून ‌‘उडता महाराष्ट्र’ बनविण्याचा घृणास्पद प्रकार सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावातील घरापासून हाकेच्या अंतरावर अंमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना सुरु होता. या प्रकरणात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आरोपीला सोडून दिले. काही बंगाली आणि बांग्लादेशी कामगारांना अटक करून मुख्य सुत्रधाराला सोडून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ड्रग्स निर्मिती करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने सातारा ड्रग्स फॅक्टरी प्रकरणी उत्तरे द्यावीत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिथे जाऊन धाड घालेपर्यंत सातारा पोलिसांना यांची कल्पना नव्हती का? त्यांच्या आशिर्वादानेच हा कारखाना सुरु होता? की उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक हा कारखाना चालवत असल्याने कारवाई होतं नव्हती? असा आरोप सकपाळ यांनी केला आहे.

Exit mobile version