महाड तालुक्यात पूरजन्य स्थिती

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

भोंगा वाजला नि नागरिकांमध्ये घबराहट

| महाड | प्रतिनिधी |

गेली दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज वाढला असून, या मुसळधार पावसामुळे तालुक्यामध्ये पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

गेली दोन दिवस या संततधार पावसामुळे महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी, काळ या नद्या उफाळून वाहू लागल्या आहेत. यामुळे महाड तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुलांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. शहरातील गांधारी पूलदेखील पाण्याखाली गेला असून, येथील रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे क्रांतीस्तंभाजवळदेखील पुराचे पाणी शिरले आहे. दस्तुरी नाका ते नातेखिंड हा रस्तादेखील पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाड रायगड रस्त्यावरील वाहतूकदेखील बंद झाली होती. सांदोशी गावाजवळदेखील पुलावरून पाणी गेले.
पूरपरिस्थिती जाणवू लागल्यानंतर महाडमध्ये नागरिक आणि व्यापारी यांच्यात चांगलीच घबराट निर्माण झाली. तालुक्यातील अनेक शाळादेखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव अर्ध्यातून सोडण्यात आल्या. महाड आपत्कालीन केंद्रातून या पूरजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, दुपारी तीन वाजता पाण्याची पातळी वाढू लागल्यानंतर नागरिकांना आपत्कालीन विभागाकडून सतर्कतेचा इशारा म्हणून भोंगा वाजवण्यात आला. दरम्यान, वरंध, धरणवाडी येथील अर्जुन धनावडे यांच्या घराची भिंत कोसळली असून, अंशतः नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेली दोन दिवसांत जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस 2200 च्या अधिक झाला आहे. महाड तालुक्यात प्रतिवर्षी सुमारे तीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. यावर्षी ऑगस्ट महिना उलटण्यास काही दिवसच बाकी असले तरी अजून सुमारे एक हजार मिलीमीटर पावसाची गरज आहे.

Exit mobile version