12 तासांत 158 मि.मी. पाऊस
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात रविवारी (दि.15) सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत 158 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने सरासरी पावसाची नोंद 3,729 मि.मी. झाली आहे. यामुळे रातोरात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, सोमवारी (दि.15) पोलादपूरमधील जनजीवन नेहमीप्रमाणे सामान्यच राहिले.
पावसाने 1 सप्टेंबरपासून रजा घेऊन 5 सष्टेंबर रोजी हजेरी लावल्याने 14 मि.मी. नोंद झाली. त्यानंतरच्या नोंदी सुटी व अन्य कारणांनी पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाने प्रसिद्धीस दिल्या नाहीत. मात्र, रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाची नोंद 158 मि.मी.होऊन उपलब्ध नोंदींच्या बेरजेनुसार सरासरी पावसाची नोंद 3729 मि.मी. झाली असल्याचे दिसून आले आहे. 14 आणि 15 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अर्लट इशारा दिला असून 16 सप्टेंबर रोजी यलो अर्लट चाइशारा दिला असल्याने मंगळवारी (दि.16) देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
