पुण्यात झाड कोसळून फूलविक्रेत्या महिलेचा मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्याला सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने पुण्यात पहिला बळी घेतला. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रोडवर झाड कोसळले. पु. ल देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती मंदिराजवळील ही घटना घडली. या झाडाखाली तिघेजण अडकले होते. यामधील मंदिराशेजारील फूलविक्रेत्या महिलेचा झाडाखाली दबून मृत्यू झाला तर दोघांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. रंजना नवनाथ गिरी असे मृत महिलेचे नाव आहे. पुण्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील बालाजीनगर, सिंहगड रोड, हडपसर येथील अमरनगरी येथे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सिंहगड रोडवर पडलेल्या झाडामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. गेल्या तीन तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसून होर्डिंगचे मोठं नुकसान झाले आहे.

Exit mobile version