जनसंघटना वाढविण्यावर भर द्या: शेकाप नेते जयंत पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

राज्यात शेतकऱ्यांसह बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहेत. मागासवर्गीय घटकांचे अधिकार काढण्याचा डाव आखला जात आहे. महागाईच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. मात्र, सत्ताधारी आमदार-खासदार फोडण्यामध्ये मग्न आहेत. सर्वसामान्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ही मोठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पक्षसंघटना वाढवून जनतेच्या प्रश्नांचा आवाज बनण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक मंगळवारी (दि. 30) मुंबई येथील कार्यालयात झाली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. या बैठकीत शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील, ॲड. राजेंद्र कोरडे, आ. बाबासाहेब देशमुख, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, डॉ. अनिकेत देशमुख, रामदास जराते, मोहन गुंड, बीडचे जिल्हा चिटणीस नारायण गोले पाटील, रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या बैठकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ध्येय धोरणे स्पष्ट करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला व वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची संघटना उभारण्याचे धोरण आखण्यात आले. वेगवेगळ्या संघटनाचे जाळे राज्यभर निर्माण करून तळागाळातील घटकांसह वंचित, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यात बेरोजागारीचा प्रश्न गंभीर असताना, शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

महागाई गगनाला भिडली आहे. सर्वसामान्य या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. तसेच मागासवर्गीय घटकांचे अधिकार हिसकावण्याचा डाव आखण्यासाठी उपवर्गीकरणचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. राज्यात वेगवेगळे प्रश्न असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सर्वसामान्यांचा आवाज बनण्याचे काम कायमच शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जनसंघटना वाढवून जनतेच्या प्रश्नांचे राजकारण रस्त्यावर उतरून करण्यासाठी तयार व्हा. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य निर्माण झाले पाहिजे. त्या जिद्दीने सर्वांनी कामाला लागला, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

खोपोलीत होणार वर्धापन दिन
2 ऑगस्ट रोजी होणारा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे घेण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या तयारीसाठी जिल्हा, तालुका स्तरावर बैठका घेतल्या जाणार आहे. पदाधिकाऱ्यांचे दौरे जिल्ह्यात काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Exit mobile version